सोंडाई - एक अज्ञात किल्ला
पूर्वी मुंबई ला जात असतांना काही महत्वाचे अमिश दाखवले जायचे. अर्थात लहान होतो तेव्हा असो, वा आत्ता, खाण्यासाठी जन्म आपुला हे देह पाळत आलो आहे. तर रमाकांत नावाचे एक छान असे हॉटेल, म्हणजे तेव्हा होते, जिथे वडे भारी मिळायचे, अशा ठिकाणी "वडे आणि thumps up मिळेल आलात तर", असे सांगून आम्हाला या नाही तर त्या नातेवाईकांकडे नेण्यात यायचे. परवा याच रमाकांत वरून जात असतांना लहानपण आठवले. खूप काही आठवणी. माझी मावशी ठाण्याला रहायची आणि तिच्या कडे जात असतांना मात्र या वड्याचे पण कौतुक नसायचे. असो. तर हा सोंडाई नावाचा किल्ला तसा अपरिचित आहे. सोंडेवाडी नावाचे पायथ्याचे गाव, जे कर्जत पासून मला वाटतं १० - १२ कि मी वर असेल, एका निसर्ग रम्य ठिकाणी नेऊन ठेवते. जातांना डावीकडे मोर्बे नावाचे धारण लागते. मस्त आहे. तिथूनच पुढे काही अंतरावर सोंडेवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. गावकरी गाडी लावायचे रुपये १०० घेतात आणि ते न कटकट करता द्यावे.
किल्ल्यावर जाण्याची वाट मळलेली आहे. काहीही कठीण असे नाही आणि त्यामुळे निवांत वर जात सुद्धा ३५ ते ४० मिनिटात माथ्यावर पोचू शकता. वरच्या बाजूला ३ शिड्या आहेत ज्यांनी गडमाथ्यावर पोहोचणे अगदीच सोपे केले आहे. या किल्ल्यावर एक मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहेत फक्त. बाकी विशेष काही पाहण्यासारखे नाही. काही पाण्याच्या टाक्या आहेत ज्यामुळे हा किल्ला आहे याचे स्मरण होते. दरवाजा नाही की काही तटबंदी, ना काही वाड्यांचे अवशेष ना काही इतर. Watch Tower म्हणून या किल्ल्याचा वापर करत असावेत असे वाटते.
या किल्ल्या जवळ तसे अनेक किल्ले आहेत. इर्शाळगड, प्रबळगड सारखे बलाढ्य किल्ले आहेत जिथे जायचे ठरले आहे. मी आणि चेतन दोघेच जण होतो या वेळेला. पिंटू आजारी पडला होता आणि भूषण पुण्यातील एका प्रतिष्टीत बिल्डर पैसे देत नाही म्हणून मागे लागला होता. पुण्यातील बिल्डर म्हणले की हे आलेच. अर्थात, काही चांगले सोडून. पुढच्या आठवड्यात पिंटू बरा होऊन आणि भूषण कंटाळून ट्रेक ला नक्कीच येतील अशी अपेक्षा आहे.