वज्रगड प्रदक्षिणा
अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी यांची कविता उभेहूब आठवणीत येते. अशाच एका रविवारी आम्ही ट्रेककरी गॅंग नी भोर ला जायचे ठरवले. दिवस विशेष होता. फुटबॉल वर्ल्ड कप ची फायनल. अर्जेन्टिना विरुद्ध स्पेन. घोलप शेठ नी जागा ठरवली आणि जेवायची आणि राहायची सोया केली. उत्तम केली. दुपारी ३ नंतर पोचायचे ठरले आणि २१ लोक तयार झाले. पावसाळ्यात जिथे तिथे गर्दी चालू झाली होती. बनियान गॅंग जागृत झाल्या आणि दारुडे रविवार सकाळ पासून घाट वाटा आणि निसर्ग रम्य ठिकाणांवर ढाकचिक करून घाण करायला सुरुवात झाली. खळदकर नावाच्या मित्रांनी वज्रगड चा आवाज टाकला. पुरंदर च्या मागे लपलेला हा एक मस्त किल्ला आहे. जास्त कोणाला माहिती नाही त्यामुळे किल्ला अजून शाबूत आहे. त्याचे फार रील्स नाहीत त्यामुळे तिथे खाली पार्किंग ला पण जागा आहे आणि पैसे नाही घेतले जात. थोडे फार प्लॉट चे प्रोजेक्ट दिसले पण बाकी गाव छान आहे अजून.
रविवारी सकाळी निघायचे नियोजन झाले आणि ८ जाण तयार झाली. प्लॅन सिम्पल होता. ८ ला निघायचे ९.३० च्या सुमारास पायथा. एका मित्रानी सांगितले होते की १.५ तास लागेल वर पोहचायला. असे सर्व ठरवून आपण जेवण करून ३ ते ४ पर्यन्त भोर ला पोचायचे. निवांत एक झोप काढून संध्याकाळ साठी टकाटक. हा हा हा हा ..........
वातावरण अशक्य होते. हिरवेगार सर्वत्र. पावसाळ्यात ट्रेक करायची मजाच काही वेगळी आहे. अर्थात ज्यांना ट्रेकिंग, चिख्खल, क्रॅम्प, ब्लिस्टर्स आणि जितकी स्वतःची कॅपॅसिटी आहे त्याचे लिमिट बघायचे असेल तर - या सर्वांची आवड आहे तेच त्याचा आनंद घेऊ शकतात आणि ट्रेक झाल्यावर गरम चहा चा आस्वाद घेत घडलेले किस्से आणि लागलेली वाट हसत खेळत धम्माल करत चर्चा करू शकतात. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे हेच सर्व झाले.
दादा वाट कशी हो गडावर याची - हे काय समाधी लगद रस्ता सरळ त्या पांढऱ्या पाशी नेतो आणि तिथून वर की पोचलाच गडावर. वाह क्या बात है. आम्ही निघालो. वीर उमाजी नाईक यांच्या समाधी ला अभिवादन करून वर निघालो. खडी चढाई आहे आणि एका सोंडेवरून दुसऱ्या जावे लागते. २ आठवड्यांपूर्वी पावसानी झोडपल्याचे अवशेष दिसत होते. प्रचंड कारवी वाढली होती आणि वाट काही दिसत नव्हती. किल्ला हा का तो हे पण कळायला मार्ग नव्हता कारण धुक्यात माथा लपलेला होता. अप्रतिम वातावरण होते. काय सांगू. मधेच पाऊसाचा शिडकावा आणि परत थोडेसे ऊन - हा खेळ चालू होता. जसे आम्ही मध्यावर पोचलो - ५० मी मध्ये तसे सर्व बरोबर चालू आहे याची खात्री पटली. अहो, तिथे दगडांनी काढलेला एक बाण पण दिसला.
तिथून लांब वरून वारा पावसाळा खेचत आमच्या पर्यन्त येतांना दिसायचा. आम्हाला भिजवून पुढे निघायचा. हा खेळ चालू होता. बाण दिसला आणि पोरं सुसाट सुटली. किल्ल्याच्या डावीकडून चालायला लागली. कारवी आणि इतर शेकडो वेगवेगळ्या दिसणाऱ्या झुडुपातून वाट काढत पुढे निघालो. मी एक वेडेपण केले ते म्हणजे शॉर्ट्स घालून गेलो होतो. विचार इतकाच की पाऊस आहे तर फुल पॅन्ट कशाला. पण हेच चुकले. पायावर असंख्य वार होत होते. त्यातून मग कण भर रक्त आणि मग इतर किडे आणि त्यांचे चावणे. हे पुढे बरेच तास सहन करावे लागले. साधारण आम्ही १.५ तास चालल्यावर आणि किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचल्यावर लोकांना शंका यायला सुरुवात झाली. तरी पण पुढे बघू म्हणत आमची ३/४ प्रदक्षिणा पूर्ण झाली, जो काही खरा प्लॅन नव्हता. पूर्वी जाऊन आलेला एक मित्र - मग त्याला फोन झाला आणि त्यांनी वाट सांगायच्या नादा मध्ये आम्ही आमची वाट लावून घेतली आहे याची जाणीव झाली. १ वगरे वाजून गेला होता. इतके पुढे गेलो होतो की पुरंदरवर असलेले आर्मी चे चेकपोस्ट दिसायला नाही तर जवळ दिसायला लागले होते. एकदा किल्ला उजवीकडे ठेवा एकदा डावीकडे - पण किल्ल्या वर जाण्याचा काही मार्ग दिसत नव्हता. परत फिरलो आणि ३ तास आणि ७ कि मी ची पायपीट हा एक अनुभव घेऊन गप्पा आणि इतर चालू केले. लांब वर काही माणसे दिसली. त्यांना गाठले आणि शेवटी रस्ता मिळाला. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळून एकंदरीतच हा ट्रेक जरा थरारकच म्हणायचा. त्यात निसरडे झाले होते. बरेच ठिकाणी exposure चांगलेच होते. एक टप्पा आऊट ला फुल्ल स्कोप. शेवटी वर निघालो आणि बुरुजाच्या खाली एका रॉक patch पाशी येऊन अडकलो. अर्धा चढला आणि कळले की हे काही खरे नाही. दोर नसेल तर खूपच रिस्क आहे. आमच्यातील एक वर चढला पण बाकी ७ जाणे आम्ही बुरुजापासून माघार घेतली. त्याच बुरुजावर अर्धवट एक मुलगा २० मी नी अडकलेला होता.
दुपारचे २.३० वाजले असतील, पोटात काही नव्हते. खाली येऊन मस्त २ वाजता जेवायचा प्लॅन होता. पाऊस जोरात पडायला लागला होता. जो चिख्खल आधी ग्रीप देत होता, पाऊसाने घसरडा झाला. लोकांचे पृष्ठभाग चॉकलेटी झाले. अशक्य घसरत आणि सावरत आम्ही परत उलटी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. किरण जो वर गेला होता तो दुसऱ्या बाजूनी खाली आला आणि आम्हाला आधी दिसलेल्या बाणापाशी भेटला. त्याच बाणापासून १० मीटर वर अजून एक बाण काढलेला होता जो झाडांमध्ये लपलेला. तो काही दिसला नाही. तिथून गडावर जायला सरळ वाट आहे. शेवटी काही पाहिऱ्या आणि भिंत आणि सुंदर दरवाजा आहे :-( असे किरण नी सांगितले आणि VDO दाखवला. बाणापासून वर ४० मी नी मध्ये पोचणे शक्य आहे. गडाकडे पहिले आणि परत येऊ असे सांगून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. ५.३० ला आम्ही सर्व भिजलेले, चॉकलेटी झालेले भुकेले पोरं गाडी पाशी पोचलो.
पायलट ट्रेककरी हेच ग्रुप चे नाव असल्यानी हा आमचा ट्रेक खूप छान झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण ही प्रदक्षिणा कोणीही केला नव्हती. सर्व मिळून १७ - १८ किलोमीटर डोंगरावर भटकंती झाली. वर्षासहल म्हणा नाही तर काही म्हणा हा अनुभव अफलातून होता. वज्रगड - पुरंदर च्या सावलीत दडलेला एक अनोखा किल्ला.