Wednesday, 17 February 2021

चांदवड / ऐश्वरेश्वर



चांदवड / ऐश्वरेश्वर 

सातमाळ डोंगर रांगेत असलेला हा एक खूप सुंदर किल्ला. मागच्या आठवड्यात काही कारणांनी सचिन जोशी बरोबर जाणे जमले नाही. या आठवड्यात साधारण गुरुवार शुक्रवार दरम्यान त्याचा निरोप आला की चांदवड, जो अत्यंत्य कठीण किल्ला आहे आणि इंद्राई जो अत्यंत मोठा किल्ला आहे, बलाढ्य आहे, अशा किल्ल्यावर जाण्याचे ठरले आहे. अर्थात शनिवार रविवार असा ट्रेक असेल. मी आणि चेतन तयार झालो. या वेळेला खूप वर्षांनी एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर जाण्याचा योग आला. सर्व नवीन माणसे, वेगवेगळ्या क्षेत्रातली, पण सर्वांना जोडणारा धागा म्हणजे ट्रेकिंग. भटकंती आणि नवनवीन ठिकाणे शोधून जाऊन सर करून परतणे. या मध्ये डॉक्टर, इंजिनीर, विद्यार्थी, इतिहास संशोधक आणि गिरियारोहणात छत्रपती पुरस्कार विजेते असे सर्व जण होते. १२ पासून ६३ वयापर्यन्त आम्ही साधारण १७ जण होतो. 


मी आणि चेतन गाडी घेऊन निघालो आणि नारायणगाव ला परिवार मिसळ पाशी इतर गॅंग ला भेटलो. तिथे ओळखी झाल्या. राजेश नावाच्या एका गृहस्थांनी मला विचारले " तू ट्रेकिंग सोडून अजून काय करतोस ?" या वाक्यांनी त्यांनी मला जिंकलं. या १७ मधील काही लोक वगळता सर्वांचे २०० हुन अधीक किल्ले पाहून झाले आहेत. नवनवीन डोंगर शोधत हिंडत असतात. त्यामध्ये ढवळे काका म्हणाले, अरे लांब वर डोंगरावर भगवा फडकतांना दिसला की मी निघतो आणि तिथे पोचतो. मंदिर पाहायला मिळते पण महत्वाचे म्हणजे एक नवीन ठिकाणाचा परिचय होतो. तो किल्लाच असला पाहिजे असे काहीच नाही. सर्व weekends ते बाहेर असतात. अशा अनेक मजा आणि आनंदी प्रसंग लुटत आम्ही सिन्नर ला पोचलो. सर्वांना जेवण करायचे होते आणि ते पण मिसळ. सिन्नर मध्ये पोहोचल्यावर तिथे एका मारुती मंदिर समोर गाडी उभी करून  एका धष्टपुष्ट दादा ला विचारले, "दादा मिसळ कुठे मिळेल चांगली" तो म्हणाला "मोहरं जाऊन right मारा. तिथे भारी मिसळ मिळते" तिथे पोचल्यावर कळले की हे मिसळीचे हॉटेल आहे आणि नुसती टपरी नाही. साधारण १५० लोकांची नीट बसायची सोय असलेलं ऐश्वर्या मिसळ नावाचे एक छान ठिकाण मिळाले. १७ मिसळ, अनेक दही आणि ताक, पापड चहा अशी पोटपूजा करून आम्ही तिथून निघालो.





मिसळ खात असतांना सचिन म्हणाला की इथे जवळच ऐश्वरेश्वर मंदिर आहे जे १००० हुन जास्त वर्ष जुने आहे. तिथे जाऊ आणि पाहू. बाहेर आलो तर कळले की ते मंदिर समोरच आहे. आम्ही सर्व जण त्या मंदिरात पोचलो. दर्शन घेतले. खूप खूप सुंदर मंदिर आहे. इतका इतिहास आणि इतके सुंदर मंदिर पण किती लोकांना माहित असेल याची कल्पना नाही. सचिन नी त्या मंदिराची उभारणी, त्याचे वैशिष्ठ्य, इतिहास आणि काही गोष्टी सांगून आम्हा सर्वांना भूतकाळात नेले. तिथे असलेलं यादवांचे ऐश्वर्य, म्हणूनच बांधलेले ते मंदिर. 









सिन्नर हुन लासलगाव मार्गे आम्ही चांदवड ला पोचलो. बऱ्यापैकी ऊन होते. चंद्रेश्वर मंदिरापर्यन्त रस्ता आहे. तिथे गाडी लावून देवळाच्या मागच्या बाजूनी किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. जाण्याच्या वाटेवर डावीकडे एक तलाव आणि तिथे काही थडगी आहेत. 






तारेचे कंपाऊंड शेजारून वाट वर जाते तसे जावे. किल्ल्याच्या उजव्या बाजूनी वर जाणाऱ्या पाहिऱ्या आहेत. चढण चढून जाऊन वर उजवीकडे जाणारी वाट धरावी. इंग्रजांनी सर्व पाहिऱ्या फोडून टाकल्यामुळे शेवटचा टप्पा करत असतांना रोप ची गरज लागतेच. आमच्या बरोबर एक ६३ वयाचे तरुण काका आले होते. छत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र मधील पहिल्या  एव्हरेस्ट मोहीमे मध्ये ते होते. त्यानंतर साधारण १८ वेगवेगळ्या मोहीमा  त्यांनी केल्या आहेत. या माणसाचे कौतुक करावे तेव्हडे थोडे. सरसर करत काका त्या रॉक patch  वर चढून गेले. बघताच ते माथ्यावर होते. मी थक्क झालो होतो. वर जाऊन सर्व equipment काढून रोप लावून त्यांनी खाली सोडला. एक एक मावळा त्या दोरीच्या आधाराने पटापट वर चढू लागला. 





आम्ही सर्व गड माथ्यावर पोचलो. सुंदर अनुभव आणि अप्रतिम गॅंग भेटली होती. वर जातांना पडलेला दरवाजा आणि काही अवशेष दिसतात. पाण्याच्या टाक्या आहेत आणि गडाचा विस्तार मोठा आहे. नंदी मुख एका ठिकाणी ठेवलेलं आढळेल. तिथेच पिण्याच्या पाण्याचे टाकं आहे. ४ च्या सुमारास आम्ही परतीच्या वाटेवर लागलो. Rappelling करत उतरायचे होते. मला वाटतं  २० वर्ष तरी नक्की झाली असतील हे धाडस करून. पण आधी खूप वेळा Rappelling केले आहे. तेव्हा तर आपल्या गडावर पण रॉक climbing आणि इतर गोष्टी करायला जायचो. Basic Mountaineering ची शिबिरे तिथे भरायची. जमलं, पटकन पूर्वीचे दिवस आठवले आणि सर्व आपोआप अंगात शिरलं. खाली उतरून निघे निघे पर्यन्त अंधार पडायला सुरुवात झाली होती. 










देवळापाशी येऊन हाथ पाय धून गाडी जवळ गेलो. घाट खाली उतरून उजवीकडे असलेल्या ढाब्या वर चहा पियालो. सर्व जण निवांत गप्पा मारत बसले होते. रात्रीच्या जेवणाची काय सोय करायची आणि कुठे जायचे हे ठरत होते. पुढे जाऊन एक चांगला ढाबा आहे तिथे जेवण घेण्याचे ठरले. मी सचिन आणि चेतन मात्र रात्री राहायची कुठे सोय होईल का हे बघायला निघालो. पलीकडे असलेलं सुंदर गणपती मंदिर नजरेस पडले. इच्छापूर्ती गणपती मंदिर. तिथे राहायची सोय, बाहेर मोठे पटांगण आणि श्रीमंत मंदिराचा वास सर्व कडे दरवळत होता. आत जाऊन विचारले की राहायची सोय काही होऊ शकेल का. खोल्या नकोत, पडवीत आम्ही झोपू आणि सकाळी लवकर उठून निघून जाऊ. इच्छापूर्ती मंदिरात बाप्पा नी आमची इतकी थोटीशी इच्छा पण पूर्ण नाही केली. ट्रस्ट आणि ट्रस्टी आणि त्याचे नियम आणि कायदे, बाहेरील माणसांना कसे नाही राहू देत वगरे वगरे सांगून तिथल्या माणसांनी आम्हाला चांगल्या भाषेत निघा असे सांगतिले. या बाप्पा च्या मंदिराच्या नावातच स्वार्थ भरला आहे हे कळले. पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा आत पाऊल ठेवायचे पण VIP Rs ५०० असे तिकीट काढून जावे लागेल. असो. परत त्याच धाब्यावर आलो आणि एक गावकरी भेटला. म्हणाला की आमच्या गावात मस्त मारुती मंदिर आहे. तिथे चला. तिथे तुमची सोय करतो. त्या मंदिराचा अजून बाजार झाला नव्हता. वडबारे नावाच्या गावी आम्ही पोचलो. दुसऱ्या दिवशी याच गावातून इंद्राई चा किल्ला सर करायचा होता. गावात पोहोचलो आणि मारुती मंदिर जवळ गाडी लावली. मंदिरात गावकरी काहीतरी गोल करून बसून खेळत होते. आमच्या बरोबर आलेला जाधव आत जाऊन त्या इतर गावकऱ्यांना म्हणाला  की साहेब आले आहेत. हे वाक्य बोलून तो तिथून निसटला. मी सचिन आणि चेतन मंदिराबाहेर उभे. आतील गावकरी, जेहर्यावर अत्यंत गंभीर भाव, काहीसा घाबरलेला भाव घेऊन चटकन उठून दरवाज्या पाशी आले आणि उभे राहिले. २ मिनिटे गेली कोणी काही बोलले नाही. त्यानंतर सचिन नी  विचारले. "दादा उद्या इंद्राई ला जायचे आहे तर आज रात्र इथे काढू का ?" असा प्रश्न येताच सर्व लोक खो खो करून हसायला लागले. म्हणाले की आम्हाला वाटले की साहेब आता उचलून नेणार. ते सर्व लोक आत पत्ते खेळात होते. 

जरून राहा की, काय हवे नको सांगा. पाणी हवे तरी सांगा आणि चहा हवा तरी सांगा. निवांत झोपा. आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही गाडी काढून परत त्या धाब्यावर गेलो आणि खूप जेवलो. ताक छान होते. सर्वांना घेऊन मारुती मंदिरात आलो आणि आपापली जागा शोधून तिथे स्थिरावलो. सकाळी ५ ला निघालेलो २६० km drive करून ट्रेक करून रात्री १० च्या सुमारास पाठ टेकली आणि डोळे मिटले. क्षणात झोप. एक सुंदर दिवसाचा शेवट झाला. उद्याची काळजी न करता आणि कालचा विचार न मनात येता जेव्हा अशी गाढ झोप लागते तेव्हा ...... 







इतिहास :
पौराणिक कथेनुसार अगस्ती मुनींचा आश्रम चांदवड गावाजवळील डोंगरावर होता एकदा त्यांना भूक लागली असता त्यांनी चार रोडगे भाजले आणि त्यावर लावण्यासाठी तूप मागण्यासाठी ते गावात गेले. पण गावात त्यांना कोणीही तूप दिले नाही. त्यामुळे त्यांनी या नगरीला चांडाळ नगरी असे नाव ठेवले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन चांदवड हे नाव पडले. अगस्ती मुनींनी आपल्या जवळील चार रोडग्या पैकी अर्धा रोडगा गाईला दिला आणि उर्वरित रोडगे तेथेच सोडून दिले. चांदवड किल्ल्यासमोर असलेल्या डोंगराला त्यामुळे साडे तीन रोडग्यांच्या डोंगर असे नाव पडले आहे .

चांदवड किल्ला कोणी बांधला व केव्हा बांधला हे ज्ञात नाही पण नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन (इसवीसन ६५०) यांच्या ताम्रपटात चंद्रादित्यपूर म्हणजेच चांदवडचा उल्लेख आढळतो म्हणजे त्याकाळी हा किल्ला अस्तित्वात होता .
इसवीसनाच्या अकराव्या शतकात यादवांच्या ताम्रपटात चांद्रादित्यपूरचा उल्लेख आढळतो. निजामशहाच्या काळात मुघल बादशहा शहाजहान याने शाहिस्तेखानाला महाराष्ट्रातपाठवले होते. शाहिस्तेखानाने आपला अधिकारी अलीवर्दीखानाकडे चांदवड परिसरातील किल्ले घेण्याची जबाबदारी सोपवली होती. इसवीसन १६३६ मध्ये अलीवर्दीखानाने चांदवड किल्ला आणि गाव जिंकून घेतले.

दुसऱ्या सुरत लूटी नंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाणातून राजगडावर जात होते. त्यासुमारास औरंगजेबाला सूरत लुटीची बातमी कळली आणि त्याने खानदेशचा सुभेदार दाऊदखान कुरेशी याला आदेश दिले की शिवाजी महाराजांकडून खजिना हस्तगत करावा. त्यानुसार दाऊदखान पाच हजार सैन्यानिशी चांदवड किल्ल्यावर पोहोचला. त्याने याठिकाणी कांचनाच्या लढाईची तयारी केली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इसवीसन १६८२ मध्ये मराठ्यांची एक तुकडी चांदवड वर चालून गेली होती.

पहिल्या बाजीरावाच्या काळात चांदवड किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी चांदवडचा किल्ला मल्हाराव होळकर यांच्या ताब्यात दिला. पेशव्यांच्या काळात चांदवड किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. तुकोजी होळकर यांच्या कारकिर्दीत थोरल्या माधवराव पेशवे यांच्या परवानगीने किल्ल्यावर चांदोरी रुपयांची टांकसाळ चालू केली. इसवीसन अठराशे पर्यंत ही टांकसाळ किल्ल्यात होती व या टाकसाळीत चांदीची नाणी पाडली जात असत. इसवीसन अठराशे मध्ये किल्लेदार आणि टाकसाळ अधिकारी यांच्यातील तंट्यामुळे ही टाकसाळ चांदवड गावात हलवली गेली. याच वर्षी यशवंतराव होळकरांच्या सैन्यातील अहमद खान व आमिर खानाने मालेगाव व चांदवड लुटले. इसवीसन १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवडचा किल्ला जिंकून घेतला, परंतु तो किल्ला लगेचच होळकरांच्या ताब्यात देण्यात आला. इसवीसन १८१८ मध्ये थॉमस हिस्लॉप याने हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १८२९ मध्ये चांदवड टांकसाळीतील चांदीच्या रुपयाची नाणी पाडण्याचे काम बंद करण्यात आले. १८३० मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे काम थांबवण्यात आले आणि त्यानंतर टांकसाळ बंद करण्यात आली. (Ref http://trekshitiz.com/marathi/Chandwad-Trek-C-Alpha.html)



Sunday, 24 January 2021

सोंडाई - अज्ञात


सोंडाई - एक अज्ञात किल्ला 

पूर्वी मुंबई ला जात असतांना काही महत्वाचे अमिश दाखवले जायचे. अर्थात लहान होतो तेव्हा असो, वा आत्ता, खाण्यासाठी जन्म आपुला हे देह पाळत आलो आहे. तर रमाकांत नावाचे एक छान असे हॉटेल, म्हणजे तेव्हा होते, जिथे वडे भारी मिळायचे, अशा ठिकाणी "वडे आणि thumps up मिळेल आलात तर", असे सांगून आम्हाला या नाही तर त्या नातेवाईकांकडे नेण्यात यायचे. परवा याच रमाकांत वरून जात असतांना लहानपण आठवले. खूप काही आठवणी. माझी मावशी ठाण्याला रहायची आणि तिच्या कडे जात असतांना मात्र या वड्याचे पण कौतुक नसायचे. असो. तर हा सोंडाई नावाचा किल्ला तसा अपरिचित आहे. सोंडेवाडी नावाचे पायथ्याचे गाव, जे कर्जत पासून मला वाटतं १० - १२ कि मी वर असेल, एका निसर्ग रम्य ठिकाणी नेऊन ठेवते. जातांना डावीकडे मोर्बे नावाचे धारण लागते. मस्त आहे. तिथूनच पुढे काही अंतरावर सोंडेवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. गावकरी गाडी लावायचे रुपये १०० घेतात आणि ते न कटकट करता द्यावे. 


किल्ल्यावर जाण्याची वाट मळलेली आहे. काहीही कठीण असे नाही आणि त्यामुळे निवांत वर जात सुद्धा ३५ ते ४० मिनिटात माथ्यावर पोचू शकता. वरच्या बाजूला ३  शिड्या आहेत ज्यांनी गडमाथ्यावर पोहोचणे अगदीच सोपे केले आहे. या किल्ल्यावर एक मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहेत फक्त. बाकी विशेष काही पाहण्यासारखे नाही. काही पाण्याच्या टाक्या आहेत ज्यामुळे हा किल्ला आहे याचे स्मरण होते. दरवाजा नाही की काही तटबंदी, ना काही वाड्यांचे अवशेष ना काही इतर. Watch Tower म्हणून या किल्ल्याचा वापर करत असावेत असे वाटते. 









या किल्ल्या जवळ तसे अनेक किल्ले आहेत. इर्शाळगड, प्रबळगड सारखे बलाढ्य किल्ले आहेत जिथे जायचे ठरले आहे. मी आणि चेतन दोघेच जण होतो या वेळेला. पिंटू आजारी पडला होता आणि भूषण पुण्यातील एका प्रतिष्टीत बिल्डर पैसे देत नाही म्हणून मागे लागला होता. पुण्यातील बिल्डर म्हणले की हे आलेच. अर्थात, काही चांगले सोडून. पुढच्या आठवड्यात पिंटू बरा होऊन आणि भूषण कंटाळून ट्रेक ला नक्कीच येतील अशी अपेक्षा आहे. 






Sunday, 10 January 2021

मल्हारगड - पुनश्च हरिओम....

मल्हारगड 

शेवटचा किल्ला झाला तो मधू मकरंदगड. आणि त्या नंतर जणू जगबुडी झाली. त्या Virus नी जगाला झोपवले. एकंदरीत त्याचा खूप उदो उदो झाला आहे त्यामुळे इथे त्याची घाण नको. त्या काळात मात्र खूप काही घडले. खूप लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सरकार ला पण हे नवीनच होते पण जे केले आणि शक्य झाले त्याचे कौतुक करावे असे वाटते. नाही झाले त्याचा त्रास करून घेणे सोपे आहे. आम्ही मित्र मंडळींनी एक लाख मास्क पुण्यात फुकट वाटले. खूप लोकांची मदत त्या कामा करता लाभली. पोलीस काय हे पण कळले कारण त्याच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. एकंदरीत हा काळ शिक्षणाचा होता. निसर्गानी थोडेसे दाखवले की जमले तर मला जपा. या काळात खूप जवळची माणसे गमावली. त्यात माझे बाबा पण होते. अर्थात त्याचे जाण्याचे कारण हृदय विकार होता. पण कोण आपले कोण परके हे मात्र ते जातांना सांगून गेले. शिकवून गेले. 

तर सुमारे १० महिने आमचे ट्रेक मात्र रखडले. या ना त्या कारणांनी पुढे जात गेले. सवय झाली होती गड किल्ल्याची. आम्ही सर्व शनिवार ची वाट पाहत आठवडा भर खूप काम करायचो. म्हणतात ना ' something to look forward to' असेच असायचे. जातानाच्या गप्पा, येतानाचे वाद आणि सुंदर इतिहास या मध्ये रमून जाणे आवडायचे. 

सोमवारी मी ग्रुप वर टाकले की शनिवारी ट्रेक ला जायचे आहे. कुठे काय ते ऐत्यावेळी ठरवले जाईल. चड्डी आणि पिंटू चा ok असा reply आला. म्हणाले चला पानवती मेली. पुण्याचे जवळचे साधारण सर्व किल्ले पाहून झाले आहेत. तरी काही शोधकाम करतांना हा एक गड सापडला जो घराच्या मागे होता आणि इतकी वर्ष तिथे गेलो नव्हतो. मल्हारगड - सोनोरीचा किल्ला. हा किल्ला  सर्वात शेवटी बांधलेला म्हणून प्रसिद्ध आहे. साधारण १७५७ - १७६० या काळात झालेले याचे बांधकाम आहे. त्यामुळे किल्ल्यावर बघायला बरेच काही आहे. तटबंदी शाबूत आहे. किल्ल्याचा विस्तार पण बऱ्यापैकी मोठा आहे. सासवड जवळ असलेला हा किल्ला इतका सुंदर आणि बघण्यासारखा आहे, की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार जावे. गाडी वर पर्यन्त जाऊ शकते. पण किल्ला चढायला पण छान मजा येते. १५ ते २० मिनिटात डोंगरमाथा. 

ट्रेक ची  सुरुवात करतांना सोपं काही तरी शोधावे म्हणून इथे गेलो. येतांना नारायपूर ला दत्ताचे दर्शन तर घेतलेच पण त्याच्या शेजारी एक सुंदर पांडवकालीन मंदिर आहे नारायणेश्वरचे ते पण पहिले. इतके सुंदर मंदिर आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे. दत्त गुरूंचे दर्शन घेता घेता लोक आमच्या शम्भो ला मात्र विसरतात. तुम्ही विसरू नका. स्वयंभू अशी सुंदर पिंड तिथे आहे. 

परतीच्या प्रवासाला पुरंदर ला जायचे नियोजन होते. वर गेलो तेव्हा कळले की मार्च पर्यन्त कोणालाही प्रवेश नाही. त्यामुळे छान छोटीशी सहल झाली आणि आम्ही परतलो. ट्रेकिंग परत चालू झाले याचा आनंद. नाशिक कडचे किल्ले चालू करायचे आहेत असे बोलणे तरी झाले आहे. बघू आता काय होते ते. 

घरी लवकर पोचून आम्ही घरच्यांना धक्का दिला हे सांगायला नकोय. 

इतिहास :
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. (ref - http://trekshitiz.com/)
























Saturday, 28 March 2020

गुडी पाडवा - या वर्षी याचे महत्व जरा जास्तच आहे.

म्हणतात की ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय सुरुवात , सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. थोडक्यात नवी सुरुवात म्हणायला हरकत नाही. पण ही कश्याची सुरुवात म्हणायची, हे कोडे काळच सांगेल. तरी आपण प्रयत्न करूया, विचार करूया, काही उलगडते का पाहूया. मनात कोडी खूप आहेत, पण त्याच कोड्यात काही उत्तरं पण आहेत. ती शोधायचा प्रयत्न करूयात. या ब्लॉग मध्ये जे काही आहे ते माझे विचार आहेत आणि त्यामुळे कोणाला दुखलं तर मी आत्ताच क्षमा मागतो. 

गुडी पाडवा म्हणजे बाबा चा वाढदिवस. दर वर्षी या दिवशी माझे काका आणि आत्या घरी जेवायला येतात. या वर्षी पण ठरले होते, पण अर्थातच ते घडले नाही. एका प्रथेचा शेवट झाला. सकाळी गुडी उभारतांना मनात विचारांचा कल्लोळ चालू होता. जगावर आलेले हे एक संकट, कोरोना चे, आणि त्यांनी मिटलेले अनेकांचे डोळे, केलेला विनाश आणि मनुष्य प्राण्याला दाखवून दिलेली निसर्गाची शक्ती, यांनी तरी माणसाचे डोळे उघडणार आहेत का ?

इंग्रजांनी हिंदू मुस्लिम distancing करून काही वर्ष का होईना राज्य केले. आजचे राज्यकर्ते तेच करतात, माणसांच्यात जाती धर्माचा आधार घेऊन फूट पडतात.... आणि काय मत मिळवतात. आणि काय पैसे ओढतात. पुढे काय. निसर्गाच्या समोर सर्व एकच. तो पाहत नाही की हा हिंदू आहे का अजून कोणी. जाती धर्माच्या या भांडणांतून आज या प्रथेचा शेवट करून नवीन सुरुवात करायची का ?

सकाळी गच्चीवर गेलो होतो. काल पाऊस झाला. वातावरण थंड होते. आणि आभाळ स्वच्छ. US मध्ये असतांना दूर दूर वर छान दिसत असेल. प्रदूषण कमी असल्यानी असेल. पण आज पुण्यात पण तोच अनुभव आला. एक आठवडा झाला असेल, वाहने रस्त्यावर नसल्यात जमा आहेत. पुणे स्वच्छ झाले आहे. यातून काही तरी शिकून आपण शहाणे होऊ का ? या गुडी पाडव्याला सर्व जण ठरवून आठवड्यातून २ दिवस वाहन न वापरण्याची गुडी उभारू का ?

 कामाच्या निमित्ताने, गेले काही वर्ष माझे गावोगावी फिरणे चालू आहे. त्यात ट्रेकिंग मुळे बऱ्याच अशा गावांचा परिचय झाला आहे, जिथे बस किंवा इतर वाहने जाऊच शकत नाहीत. तिथे आपलीच माणसे अगदी बेसिक मध्ये राहतात. तिथल्या प्रथा पाळतात आणि दोन घास खाऊन सुखी जीवन जगतात. आता हे आपल्याला, सर्वांना शक्य नाहीये हे पण तितकच खरं. पण त्यांच्या सारखे जगायला गावातच जावे लागते असे नाही. इथे पण तसे जगू शकतो. तसे म्हणजे नक्की कसे ? Basics मध्ये म्हणजे कसे. जितके पुरते किंवा जितक्याची आवश्यकता आहे तितकेच. मग ते पाणी असो वा पेट्रोल, वीज असो वा अजून काही. आज संकट आलं तर सर्वांना सर्व जमले. मग तसेच छान काटकसरीत राहू शकतो का आपण. निसर्गाचे जतन करू शकतो का आपण ? या वर्षी तीच ती गुडी उभारूया. अर्थात हे संकट टळले की  माणूस धर्म आपण पाळणारच, नाश चालू करणारच... तरी एक अशा, या पाडव्याला. 

काही लोकांना आपण खूप गृहीत धरतो. सहज घरी अन्न येते, सहज दूध, सहज औषधं आणि सहज मेडिकल सेवा. हीच सहज कामं करणारी आपली माणसे आज दिवस रात्र एक करून रुगणांना वाचवत आहेत. बॉर्डर वरचे जसे तशीच ही एक युद्ध भूमी बनली आहे. मामा, नर्सेस, अनाथ आश्रम सांभाळणारे, वृद्धांची काळजी घेणारे, पोलीस, रस्ते नीटनेटके ठेवणारे, कचरा उचलणारे, आपल्या जीवाची न पर्वा करता सतत काम करत आहेत. आज या लोकांच्या कष्टाचे, धैर्याचे कौतुक म्हणून आपण गुडी उभारूया. माझे या सर्व सैनिकांना शतशः प्रणाम. 

आपल्या हयातीत असे हे Lockdown पहिल्यांदाच झाले आहे. आणि मला वाटते ही विनाशाची सुरुवात आहे. हे आता होत राहणार जोवर माणूस निसर्गाला त्रास देणे बंद करत नाही तोवर. हा आजचा पाडवा विनाशाची सुरुवात तर करणारा नाही ना हीच भीती आहे. आता भीती आली की परत देव आला की परत कोणता देव की परत धर्म आला  ... ..... ..... ....

नव नवीन पक्षी दिसायला लागले आहेत अचानक. खरे पक्षी......






















Monday, 16 March 2020

मधुमकरंद गड 14.03.2020



मधुमकरंद गड

रस्ते मोकळे, टोल नाके रिकामे, पाचगणी आणि महाबळेश्वर येथे जणू काही नाकाबंदी आहे, असे वातावरण. पहाटे ५. ३० ची वेळ असेल जेव्हा आम्ही पुणे सोडले. चड्डी च्या घरी मी पिंटू आणि भूषण पोचलो आणि २ महिन्यांच्या गॅप नंतर परत पुढच्या ट्रेक ला निघालो. करोना virus नी जगाला शांत केले होते. पुण्य नगरीत जिथे रस्ता क्रॉस करणे आता कठीण झाले आहे, जिथे श्वास घेणे मुश्किल झाले आहे, तिथे पण हा येऊन पोचला होता. शाळा कॉलेज मॉल आणि इतर बरेच काही सर्व बंद ठेवण्याचा आदेश आला होता. धंदे ठप्प पडले होते आणि शेअर बाजार कोसळले  होते. अशाच एका शनिवारी, आम्ही मधुमकरंद गडावर जायचे ठरवले. माची पर्यन्त जीप जाऊ शकते असे कळले त्यामुळे THAR घेऊन आम्ही निघालो. खंबाटकीच्या अलीकडे उजवीकडे कामत च्या समोर नेहमीच्या हॉटेल मध्ये गरम गरम चहा पोहे खाऊन महाबळेश्वर पोलादपूर मार्गाच्या दिशेनी गाडी नेली. पुण्यापासून साधारण १५० कि मी असणारा हा किल्ला, तसा लपलेला म्हणायला हरकत नाही. पोलादपूर चा वळणदार घाट उतरत आणि मागे बसलेल्या बिडी आणि पिंटू च्या शिव्या ऐकत आम्ही पार नावाच्या पाटी पाशी पोचलो. THAR मध्ये मागे बसणे म्हणजे एक शिक्षा आहे. मी आणि चड्डी पुढे सुखी होतो आणि त्यांची मजा घेत होतो. बिडी चे "तुझी बॅट आहे त्यामुळे batting तूच करणार" वगैरे मागून ऐकू येत होते. 
पार फाट्यावर डावी कडे वळून रस्ता चतुर्बेट नावाच्या गावाशी पोचतो. हेच ते पायथ्याचे गाव. तिथून एक खडबडीत रस्ता घोणसपूर नावाच्या वस्तीवर जातो. हे माचीवरच्या गाव. तिथे १० - १५ घरांची वस्ती आहे. खाली एक सुंदर मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर असे म्हणतात. 




गाडी तिथे लावून आम्ही गडावर निघालो. वाट मळलेली आहे, चढण आहे पण २० मि च्या आत तुम्ही मकरंदगडावर पोचता. पडलेला गडाचा दरवाजा लेगच दिसून येतो. 



गडावर जायच्या आधी एक वाट उजवीकडे जाते. त्या वाटेनी गेलात तर खांब टाक्याजवळ पोचता. असे म्हणातात की तिथे गुहा आहेत. खांब आहेत त्यामुळे कदाचित आत बरेच काही असेल असा अंदाज आहे. 



परतीच्या वाटेवरच उजवीकडे गडावर जायच्या पाहिऱ्या आहेत. सावकाश जावे कारण या तुटलेल्या आहेत. ५ मिनिटात गड माथ्यावर असलेल्या महादेव मंदिरापाशी जाऊन पोचता. बाहेर असलेला नंदी आणि आत सुदर शंकराची पिंड, जी बऱ्यापैकी मोठ्या गाभाऱ्यात आहे. तिथे बाहेरच्या बाजूला १० जण राहू शकतील अशी सोय आहे. 







मंदिरा समोर एक चौथरा आहे आणि काही अवशेष. तिथे एक समाधी तत्सम काही तरी आढळून येते. 


मंदिराच्या मागच्या बाजूला बाकी काही नाही. तसा डोंगरमाथा छोटा आहे. या गडाचा उपयोग Watch  tower  म्हणून करत असावेत. आम्ही चौघेजण मंदिरासमोरच्या झाडाखाली बसून धपाटे, चटणी, मिरची चेपली आणि खाली उतरायला सुरुवात केली. जायच्या वाटेवर एक दगड आहे, भोक पडलेला. Nature's creation . 



गडावरून खाली उरतलो आणि प्रतापगड नावाच्या ठिकाणी जायचे ठरले. त्याला ठिकाण, रिसॉर्ट, हिल स्टेशन असेच म्हणणे योग्य आहे. तो काही गड उरला नाही. भवानी मातेचे मंदिर आणि तिथे ठेवलेल्या हंबीरराव मोहित्यांची तलवार, ज्यानी ६०० हुन अधिक गनिमांना चिरले, पाहण्यासाठी तरी प्रतापगड वर नक्कीच जावे. बाकी काय गोलगप्पे आणि सामोसे, आणि कारंजातून येणारे मलाई छाज ( आपल्या भाषेत ताक) वगैरे हवे ते मिळतेच. जमेल तेव्हड्या लवकर तिथून पळ काढून आम्ही चौघे भोर च्या दिशेनी निघालो. एक अप्रतिम ट्रेक झाला. फार दमणून नाही झाली, पण ऊन असल्यानी जरा त्रास झालाच. बिडी चे कंबरडे मागे बसून मोडले आणि वेळेवर पिंटू ला पुढे बसवल्यामुळे माझी गाडी वाचली. नाही तर साफ करायला खूप कष्ट पडले असते. मांढरदेवी घाटातून भोर ला उतरून आम्ही राजघर ला Northridge मध्ये जाऊन सुखावलो. सूर्यास्त पाहत पडलो. 


















वज्रगड प्रदक्षिणा

 वज्रगड प्रदक्षिणा  अधिक महिना या वर्षी. त्यामुळे श्रावण चालू झाला नसून पण 'क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे' ही बालकवी य...