Friday, 5 March 2021

हरिहर - अप्रतिम, विलोभनीय.



हरिहर आणि बरेच काही 

नाशिक चे काम उरकून मी, चड्डी, बिडी आणि पिंटू त्रिंबकेश्वर च्या दिशेनी निघालो. उन्हाचा तडाखा कायम होता. दुपारचे ४ वाजले असतील. ठरल्या प्रम्हाणे अंजनेरी नावाच्या किल्ल्यावर पहिले जायचे मग पुढचे पुढे बघू. 

नाशिक, एक सुंदर शहर. हिरवेगार आणि श्रीमंत शहर. इथली लोकं मनानी पण श्रीमंत आहेत. माझी आणि नाशिक शहराची ओळख म्हणजे भोसला मिलिटरी स्कूल. दहावीत असतांना मी प्रयत्न करून पण मला तिथे काही जाता  आलं नव्हते. त्यामुळे थोडासा राग होता. नंतर कामा निमित्तानी इथे बरेच वेळा येणं झालं आणि मी या सुंदर जागेच्या प्रेमात पडलो. इथला इतिहास  खूप मोठा आहे. वेगळा आहे. नाश्का पासून ५० कि मी च्या अंतरामध्ये अनेक किल्ले, प्राचीन मंदिरं, जैन मंदिरं, पंचवटी आणि त्रिम्बकेश्वरा सारखी पवित्र स्थाने आणि अर्थात wine असे बरेच काही मोहून टाकणारे आहे. पुण्यापासून लांब पण ट्रेकिंग साठी नाशिक हे एक तीर्थस्थान आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. इथले किल्ले अंगावर येतात.  अशाच एका किल्ल्या वर आम्ही जाऊन आलो. बहुचर्चित असा हा किल्ला. 

अंजनेरी गावातून किल्ल्याला जायला एक कच्चा रस्ता आहे. त्रिंबकेश्वर समोर ठेऊन अंजनेरी डावीकडे दिसतो. त्या गावामध्ये खूप सारी प्राचीन जैन मंदिरं आहेत. आम्ही रस्त्यानी वर गेलो आणि पार्किंग पाशी काही मुलं क्रिकेट खेळतांना दिसली. पुढे जाऊन गाडी थांबवून बूट घालून तयार झालो. त्यातल्या एका पोराने तोंड उघडले. "बंद झाला" म्हणाले काय बंद झाला. किल्ला बंद झाला. ३ नंतर नाही सोडत आता. सकाळी ७ ते दुपारी ३ हीच वेळ आहे. एक दोन वेळा विनवण्या करून पाहिल्या पण काही ऐकायला तयार नाही. ठीक म्हणालो आणि चेंडू घेऊन त्याला बॉलिंग चालू केली. एक ओव्हर टाकून आम्ही तिथून निघालो. प्लॅन फेल. गावात येऊन काही प्राचीन जैन मंदिरं, जिथे आता आपले काही देव राहतात, अशा ठिकाणी जाऊन तहान भागवली.









 पुढचा प्रवास शंभो चे दर्शन घेण्यासाठी. त्रिंबकेश्वर ला पोचलो आणि गाडी लावून देवळात प्रवेश केला. आम्ही सर्व, समोरील दृश्य बघून थक्कं झालो. साधारण एक ते दोन हजार लोक रांगेत ताटकळत उभी, आजूबाजूला फुलं, VIP passes, 'तुम्हाला डिरेक्ट पिंडी समोर उभे करतो' म्हणणारे xxx, चप्पल इथे काढा, पूजा करायची का, कालसर्प, महापूजा, चला स्वस्तात बसवू  ........ हे काही दिसले नाही. मंदिरात शिरलो आणि सुमारे सर्व मिळून ५० लोक असतील. ना रांगेत उभे राहावे लागले ना शंभो चे दर्शन घेण्यासाठी पैसे भरावे लागले. सरळ मंदिरात गेलो. महादेवा चे दर्शन घेत असतांना डावीकडे एक शिपाई उभा असतो. साधारण १.५ सेकंड झाले की तो खेखसतो आणि हाथ धरून पुढे करतो. आज ठरवले होते की त्यांनी तोंड उघडले तर ..... तर काही नाही. विनंती करून अजून काही सेकंड या देवाकडे मागायचे. सांगायचे तात्पर्य म्हणजे सुंदर असे दर्शन झाले. फोर्ट view नावाच्या एका हॉटेल मध्ये आम्ही राहायचे ठरवले. 


फोर्ट View - आम्ही 2nd Flower ला राहत होतो 

सकाळी ६ वाजता हरिहर ला निघायचे. त्या हॉटेल च्या गच्ची मधून ही मोठी डोंगर रांग दिसत होती. समोर अंजनेरी, उजवीकडे त्रिंबकगड / ब्रह्मगिरी, नवरा नवरी ... रात्री च्या वेळी हे उंच काळे भोर डोंगर विचारांच्या दुनियेतुन शांततेत नेऊन पोचवतात. त्याच डोंगरांकडे बघत कधी झोप लागली कळले नाही. 

५ ला गजर वाजायच्या आधीच जाग आली. उठून पटापट आवरून आम्ही चौघे जण गाडीत बसलो. पाणी भरून घेतलं आणि हरिहर कडे निघालो. हा बहुचर्चित किल्ला त्याच्या कातळातल्या सुंदर पाहिऱ्यांसाठी प्रसिद्द आहे. साधारण सुट्टीच्या दिवशी आणि weekend ला इथे जत्रा असते. ट्रॅफिक जॅम होतो. आमच्या डोक्यात तोच विचार ठेऊन आम्ही गुरुवार ठरवला. जरा गर्दी कमी असेल आणि किल्ला पाहायची मजा येईल म्हणून सकाळी निघालो. ६.३० च्या सुमारास हर्षेवाडी नावाच्या छोट्या गावात गाडी लावली. कार पार्किंग इतके मोठे पाहून मी थक्क झालो. अंदाज आला गर्दीचा. सुदैवानी तेव्ह तिथे फक्त आमचीच गाडी होती. Harrier. 

वाट  मळलेली  आहे आणि खूप निवांत आहे. पाहिर्यांपर्यन्त अत्यंत सरळ आणि सोपी  आहे. वाट घसरडी आहे त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. उतरतांना नक्कीच. पाहिऱ्यांपर्यंत पोचायला साधारण ४५ मिनिटे लागतात. ह्या किल्ल्यावर जायचे हे खूप दिवस चालू होते. आम्ही सर्व जण खूप वेळा चर्चेत वेळ  घालवला आहे पण येण्याचा योग् नाही आला. महिपतगड उतरताना माझ्या कामाचे नियोजन नाशकात लागले आणि मी सहज पोरांना विचारलं की चला... आणि ठरले पण. अचानक ठरलेले सर्व काही मस्त पार पडते जे ठरवून पण होत नाही. अचानक मित्र मंडळ हरिहरच्या त्या पाहिर्यांपाशी पोचले ज्याचे Youtube वर video पाहुंनच निम्मे लोक येत नसतील. ७० deg नी कोरलेल्या पाहिऱ्यांना प्रत्येक पाहिरीवर खोबण्या केल्या आहेत. या खोबण्यांचा आधार घेऊन आपण वर चढू शकतो. 






काळजी घेणे नक्कीच आवश्यक आहे. इथे जर गर्दी असेल तर नं जाणे हे शहाणपणाचे होय. तिथून पडलात तर कायमचे वर जाऊ शकता. पाहिऱ्या चढून वर गेलो आणि कळले की इथे आम्ही चौघे सोडून कोणीच नाही. बिडी नी किल्ल्याचा दरवाजा उघडला. आम्ही सर्व आत शिरलो. पिंटू, ज्याला vertigo तत्सम काही तरी आहे, त्यांनी पण धाडस करून स्वतःला वर नेले. या किल्ल्याचे सांगावे तितके कमी आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर कातळात कोरलेला एक passage आहे. डावीकडे दरी आणि उजवीकडे दगड, अशा सुंदर वाटेवरून वाकून पुढे जावे लागते.





 तिथून काही पोटातल्या पाहिऱ्या आहेत. देवालाच माहिती कसे काय केले असेल. तेव्हा छन्नी हातोड्याने किती वर्ष हे काम चालू असेल याचा अंदाज नाही. मुख्य म्हणजे इथे बांधल्यावर, वर जातांना भीती वाटते तर बांधत असतांना या लोकांचे काय झाले असेल याची कल्पना करवत नाही. 









या पाहिऱ्या संपल्यावर अजून एका दरवाज्यातून गडमाथ्यावर येऊन पोचता. बघायला गेलं तर या किल्ल्याचा विस्तार असा फार काही मोठा नाही. १ तासात गड पूर्ण फिरून होतो. हनुमानाचे आणि शंकराचे मंदिर, एक बंधकाम आहे. तिथे ५ ते ८ जणांची राहायची सोय होऊ शकते. वर अनेक टाक्या आहेत आणि पाण्याला मरण नाहीये. या किल्ल्यावरून आजूबाजूचे खूप सारे किल्ले सहज दिसतात. भास्करगड, अंजनेरी, ब्रह्मगिरी, उतवड, नवरा नवरी यांचे छान दर्शन होते. आम्ही परत उतरतांना म्हणजे साधारण ९. १५ च्या सुमारास आम्हाला २५ - ३० लोकं वर येतांना दिसली. काही हर्षेवाडी कडून तर काही निरगुडपाडा या गावातून. झेंड्या पाशी शिवगर्जना झाली आणि आम्ही खाली उतरायला सुरु केले. 





उतरायच्या वाटेवर गडाच्या पायथ्याशी उजवीकडे एक छान मंदिर आहे. त्या मंदिरासमोर एक खूप छान दगडी बांधलेले टाके आहे. पाहायला विसरू नका. टाक्याच्या एका कोपऱ्याला दगडी भांड्यामध्ये पाणी काढलेले होते. थंडगार पाण्यामध्ये हाथ बुचकळून आम्ही आमचे तापलेले चेहेरे आणि हाथ गार केले. अत्यानंद झाला. 





आमचा आत्मा सुखावला होता. खूप भारी वाटत होतो. पिंटू खुश होता की तो वर येऊ शकला आणि महत्वाचे म्हणजे खाली पण उतरला. उत्साहाच्या भरात त्यांनी आम्हाला तिघांना रात्रीचे जेवण काबुल केले. खाली उतरून गाडी घेऊन आम्ही परत हॉटेल ला आलो. पुण्य नगरीत परत येण्या साठी निघालो. 

हरिहर - इतके वर्ष ऐकलेला आणि चर्चेत असलेला किल्ला झाला. खरं सांगू का, आयुष्यातल्या काही गोष्टींची खूप वाट पाहायला लागली आणि नंतर ती मिळाली की मला त्याचे काहीच कौतुक उरत नाही. हरिहर चे थोडे तसेच झाले होते. 

काही किल्लेच असे आहेत की ते जर का केले नसतील तर फाऊल समजला जातो. हा त्यातीलच एक किल्ला. जमलं तर न वाट पाहता एका ऑड डे ला जरूर जाऊन या. 













Monday, 1 March 2021

महिपतगड

महिपतगड 

वाडी बेलदार - एक सुंदर छोटेसे गाव, वाडी. गड किल्ल्यांच्या पोटात वसलेले. जगाशी काहीच संबंध नसलेले, पाच पंचवीस घरांची एक टुमदार वाडी. रसाळगड उतरून खाली आलो. थोडीशी पोटपूजा झाली आणि गाडी परत वाडी जैतापूरच्या दिशेने वळवली. खड्ड्या खुड्ड्यातुन रस्ता काढत थार पळवत आम्ही वाडी जैतापूर ला पोचलो. तिथून एक मळलेली वाट वाडी बेलदार ला पोचते जे किल्ल्याच्या पोटातले गाव आहे. वाडी जैतापूरहुन बेलदार ला पोचायला २ ते २.५ तास सहज लागू शकतात. वाट मळलेली आहे. काही काळापूर्वी रस्त्याचे काम चालू झाले.  डोंगर खोदून बेलदार वाडी पर्यन्त आता रस्ता झाला आहे. अर्थात खूप कच्चा रस्ता आहे आणि गाडी वर न्यायला चांगलेच skill लागते. छोटी गाडी पण वर जाऊ शकते हे आम्हाला दिसले. त्या गाडी चे नंतर काय होते हे माहित नाही. मी Thar  नेली होती त्यामुळे फारसा काही रस्त्याचा परिणाम आमच्यावर झाला नाही, आणि गाडी वर पण. 

धुळीचे लॉट अंगावर घेत, आणि उडवत Thar वाडी बेलदार ला पोचली. दुपारचे १२. ३० झाले असतील. सकाळ पासून थोडे थोडे खात असल्यानी किंवा उन्हामुळे असेल, आम्ही काही जेवलो नव्हतो. एका अर्थानी हे खूप चांगले झाले. वाडी मध्ये पोलीस पाटील यांच्या शी सचिन मार्फत चेतन नी संपर्क साधला होता. साहेबांनी आमच्या साठी त्यांचे घर उघडे ठेवले होते. त्याच्या मातोश्रींची प्रकृती ठीक नसल्याने ते मुंबई ला गेले होते असे कळाले. कोण येणार, काळे का गोरे, कसे आहेत, त्यांची सामाजिक स्तिथी, जात, धर्म काही कसलाही गंध नसतांना पोलीस पाटीलांनी त्याचे घर आम्हाला उघडे करून दिले होते. इतक्या दूर किल्ले बघायला येणार असलेली लोक म्हणजे आमचेच असा एक भाव इथे प्रत्येक माणसामध्ये अनुभवायला मिळाला. माणुसकी नामक काही तरी गोष्ट असते याचा भास इथे झाला. सकाळी भेटलेला विविध शहरी ग्रुप परत तिथे भेटला. जेवण करून येतांना त्यांनी आवाज दिला. गावातील एका ६० - ७० वर्षाच्या तरुण आजोबांना वाटाड्या म्हणून हा ग्रुप गडावर नेण्यासाठी सज्ज झाला. 

आजोबा सरळ तरतरीत नाकाचे, रापलेल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे, टोपी, नेहरू शर्ट आणि धोतर मळलेले, हातात एक काठी आणि पायात सध्या चपला घालून आमच्या कडे येऊ लागले. "काय पोरांनो कुठून आलात". चड्डी पुढे सरसावला आणि त्यांनी पोलीस पाटीलांशी झालेली चर्चा आजोबांना सांगितली. त्यांनी होकार देऊन आम्हाला शांत केले. राहायची सोय छान झाली. आजोबांनी विचारले काही शिधा असेल तर जेवण बनवून देतोकी. आमच्याकडे काही नव्हते. ते म्हणाले की इथे काही आणलत तरच करून मिळते नाही तर न भाजी न काही, इथे बाजार नाही त्यामुळे काहीच मिळत नाही. मीठ आणि भाकर खाऊन राहतो आम्ही. वर मंदिरात पवार म्हणून भेटले ते म्हणाले ५० लोक कसे बसे गावात उरले आहेत. बाकी सर्व पुणे मुंबई ला. इथे त्यामुळे भात आणि भाकर इतकेच जेवायला. आजोबांना म्हणालो नको काही आम्ही येतो गडावर जाऊन. त्यांनी रस्ता दाखवला आणि आम्ही चौघे पाणी भरून तिथून निघालो. मित्रांनो जर कधी वाडी बेलदार ला जायचा योग् आला तर जातांना कांदे बटाटे काही भाजी पाला किंवा मनात येईल ते नक्की घेऊन जा. तिथे आजोबांना आणि इतर लोकांना द्या. त्यांच्या साठी ही मेजवानी असेल. सुमारगड राहिला आहे करायचा त्यामुळे मी परत जातांना thar भरून घेऊन जाणार आहे हे नक्की. 

वाडी बेलदार ते गडमाथा साधारण ४५ मिनिट अंतर आहे. सर्व चढ आहे. वर जात असतानाच अर्ध्यानंतर डावीकडे एक बुरुज दिसतो. हा किल्ला इतका मोठा आहे की मला वाटत नाही तिथल्या गावकऱ्यांनी पण पूर्ण किल्ला हिंडून पहिला असेल. १२० एकरी याचा पसार आहे. आणि संपूर्ण जंगल आहे. इथे वर गेल्यावर उगाच इकडे तिकडे डांग डिंग करायला जाऊ नये. नाही तर उर्वरित आयुष्य तिथल्या जंगलात काढावे लागेल. चकवा लागतो म्हणतात. 

गडावर पोचताच समोर तटबंदी दिसते. नक्की माहित नाही पण बऱ्याच गोष्टी इथे मातीत बुजलेल्या वाटतात. अर्धवट डोके वर काढत आहेत असे वाटते.

 सचिन ला नीट विचारले पाहिजे. भयंकर ऊन असल्यानी dehydration चा त्रास हा काही नवीन नाही. त्यामुळे सारखे पाणी पीत राहणे याला पर्याय नाही. पिंटू ला त्रास झाला. त्याला खूप push करायचा प्रयत्न केला पण नंतर तो गडावर थांबला. बिडी त्याच्या बरोबर थांबला आणि नंतर एकटाच हिंडून आला. मी आणि चड्डी एक वाट धरून जंगलात शिरलो. आम्हाला मंदिर गाठायचे होते. विजेचे खांब बघत आम्ही पुढे पुढे जात होतो. जंगल घनदाट आहे. आणि आश्चर्य म्हणजे जायच्या वाटेवर उजवीकडे डावीकडे अनेक अवशेष बघायला मिळतात. ते कसेल आहेत काय आहे काही कळत नाही. असं वाटतं की या किल्ल्यावर एक छोटे से गाव तर नसेल. एकंदरीत अदभूत अनुभव आहे. रणरणत्या, भाजत असलेल्या उन्हातून A C जंगलात प्रवेश करताच जीव सुखावतो. १ ते १.५ कि मी पायपिटीनंतर अचानक आम्ही पारेश्वराच्या मोठ्या मंदिरात पोचलो. छान मंदिर आहे. २० ते २५ लोकांची झोपायची सोय मस्त होऊ शकते. समोरच पिण्याच्या पाण्याची मोठी विहीर आहे. आम्ही तिथे पोचलो आणि पडवीवर पसरलो. पाणी काढले आणि सॅक मध्ये असलेले सँडविच मोकळे केले. आतमध्ये एक म्हातारबुवा आणि पवार नावाचे गृहस्थ होते. निवांत पडलेले. नुकतेच जेवण झाले, म्हणाले. त्यांच्या शी गप्पा चालू झाल्या. त्यांनी शिजवलेले थोडेसे तांदूळ आम्हाला खायला दिले. कोरडा भात, कोरडे सँडविच आणि पाणी असे उत्तम पोटभरणी चे जेवण झाले. गप्पा मारता मारत कळले की बुवा बहिरे आहेत त्यामुळे भात खूप चविष्ठ आहे हे सांगून त्यांना काहीच कळले नव्हते. मग हातवारे करून त्यांच्या पर्यन्त धन्यवाद पोचवले. त्या दोघांनी एक एक सँडविच गोड मानून खालला. पाणी भरून दिले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 



या किल्ल्याला एकूण ६ दरवाजे आहेत. खरं तर काय बघायला आहे आणि काय नाही हे नक्की कोणाला ठाऊक आहे हे मला पण माहित नाही. जंगल आणि विस्तार इतका मोठा आहे की नक्की कुठे जायचे आणि दिशा काय हे पण कळत नाही. परत येतांना मला आणि चड्डी ला अचानक एक दुसरा रस्ता सापडला जो जंगल मधून नसून एका मोठ्या विहिरी जवळच्या पठारावरून होता. इथून आम्ही बुरुजा  पाशी १० मिनिटात पोचलो आणि खाली उतरायला सुरु केले. एका वेगळ्या किल्ल्याचा अनुभव आला. मला वाटतं हा पहिलाच किल्ला असेल, मी पाहिलेला जो अजून पूर्ण explore झालेला नाही. नसावा. 

THAR पाशी पोचलो तेव्हा अजून कुठेही सावली न मिळाल्याने पिंटू THAR  च्या सावलीत निपचित पडला होता. बिडी नजरेस पडला नव्हता पण बूट काढे पर्यन्त तो पण उगवला. चौघांनी बसून चर्चा केली आणि ठरवले की सुमारगडाला परत यावे लागेल. सर्व सामानाची आवराआवर करून थोडेसे हाथ पाय ओले करून आम्ही चौघांनी  परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

खाली परत येत असतांना डावीकडे सुमारगड दिसत होता आणि त्याच्या कडे नेणारी मळलेली वाट पण नजरेस पडली. पुढे जाऊन जंगलामध्ये ती कुठे तरी ती हरवली...... 





































रसाळगड




रसाळगड
 
आला परत उन्हाळा. हे वर्ष त्या Virus मुळे सर्वांचेच वाईट गेले. म्हणजे आर्थिक दृष्ट्या इथे मी विचार करत नाही. पण भटकंती झाली नाही फार. ज्या MH १२ चा अभिमान बाळगून आम्ही पुणेकर हिंडत होतो, त्याच MH १२ ला लोक गावामध्ये येण्यापासून थांबवत होते. काय तर corona. त्यात पण पुण्यानं नाव कमावले. इकडे सापडला तिकडे सापडला करत लोकं दिवस काढत होतो. ज्या क्षणी लोकांची भीती गेली, किंवा बाहेर पाडण्याशिवाय पर्याय नाही उरला, त्या दिवशी पासून आमची भटकंती परत चालू झाली. मागच्या आठवड्यात दोन खूप उत्तम किल्ले पाहिले. तसेच या वेळी ३ किल्ल्यांची रांग म्हणजेच रसाळगड, महिपतगड आणि सुमारगड करायचे नियोजन झाले. 
चार जाणं आम्ही साधारण ४. ३० ला सकाळी निघालो. सर्वजण वेळेत येऊन कमाल केली. 

रत्नागिरी जिल्ह्यात खेड जवळ हे तीन किल्ले छान उठून दिसतात. लक्ष वेधून घेतात. उंच उंच हे किल्ले प्रतापगड आणि मधुमकरंदगडाच्या जवळ आहेत आणि उत्साही गिरीप्रेमी या पाच किल्ल्यांचा ट्रेक करतात. 
महाबळेश्वर पोलादपूर करत खेड ला पोचलो. मौजे जैतापूर पासून रसाळवाडी कडे गाडी घेऊन गेलो. पुण्यातून तिथे पोचायला ५ तास लागले, अर्थात खुप सकाळी निघालो म्हणून. गाडी चा रस्ता झाला असल्यामुळे किल्ल्यावर चढणे अगदीच सोपे झाले आहे. खालपासून वर चालत आला तर मात्र २ तास कुठे गेले नाहीत. ऊन वाढत चालले होते. घाट उतरून समुद्र किनाऱ्या जवळ आहे याची जाणीव घामाच्या धारांनी होत होती. समुद्रा  कडून येणाऱ्या वाऱ्या बरोबर एक अजब असा सुगंध म्हणा नाही तर वास म्हणा, आपण त्या लाटांच्या किती जवळ आहोत हे सांगत होता. रसाळगड, सुंदर नीट नेटका टापटीप गड आहे . पाहिर्यांनी वर जाताच पहिला दरवाजा दिसतो. गाडी मध्ये हिंदुस्थान चे पॅटीस आणि सँडविचेस खाऊन आम्ही वर जायला निघालो. 



पहिला दरवाजा ओलांडून आत जाताच तिथे बजरंगबली चे दर्शन होते. आज पौर्णिमा होती आणि तिथे मारुती चे मस्त अंघोळ घालून छान पूजन झाले होते. 


उदबत्ती अजून संपली नव्हती. धार्मिक वातावरण  काही काळ अनुभवले. नमस्कार करून पुढे निघालो आणि दुसरा दरवाजा लागला. किल्ला मोठा नाही त्यामुळे तास भर खूप झाला बघायला. या किल्ल्या वर अनेक तोफा आहेत. आम्ही मोजल्या तेव्हा १२ - १५ तर नक्कीच दिसल्या. वर चढत असतांना अजून एक ट्रेकिंग चा ग्रुप भेटला. सांगली, रत्नागिरी, चिपळूण, पुणे आणि मुंबई असे वेगवेगळ्या ठिकाणची लोकं त्या ग्रुप मध्ये होती. साधारण ६ जण. कदाचित मुंबई चे दोघे असतील. त्यांनी खांबाचे टाके नक्की बघा असे सांगून तिथून पळ काढला. तिथून ते महीपत ला जाणार होते. आमच्या सारखेच. 



थोडे पुढे चालत गेलो आणि झोलाई मातेचे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तिथे राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोर मस्त दीपमाळ उभी आहे. 





हा सर्व परिसर अत्यंत स्वच्छ आहे. तिथे थोडीशी विश्रांती घेऊन बाकी किल्ला बघायला आम्ही निघालो. मंदिराच्या मागच्या बाजूला मोठे टाके आहे आणि तिथूनच मागे ज्याला गढी म्हणतात असे काही तरी उभे आहे. आत गेल्यावर समजते की इथे वर्षांपूर्वी काही तरी खुप मोठी वास्तू असणार. मोठा वाडा, आणि ऐश्वर्य खूप सारं. या बालेकिल्ल्या / गढी वरून खाली उतरून पठारावर एक वास्तू आहे. 







धान्य कोठार असावे असे म्हणतात. पुजारी तिथेच पूजा करत होते. चालत गडाच्या टोकाला पोचलो. खाली एक नंदी आणि आत शंभो ची पिंड आहे. ठेवलेली वाटली. ती वास्तू पण नव्याने बांधलेली असावी. एकंदरीत या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तू, पाणी आणि इतर बघता इथे लोकांचा वावर खूप जास्त असता. तास दोन तास उन्हात हिंडून ११ च्या सुमारास आम्ही खाली उतरलो. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा तडाखा जाणवत होता. मी आणि पिंटू खाली उतरून इलेकट्रोल पाण्यात घालून तयार केले. तोच तो आधार. भूषण खूप दिवसांनी आमच्या बरोबर ट्रेक ला आला होता. मधुमकरंदगड आणि प्रतापगड मागच्या वर्षी केला तेव्हा आम्ही बरोबर होतो. परत एक एक करत हरवलेली टाळकी जमा होत आहेत. गाडी काढून आम्ही बेलदारवाडी नावाच्या लहानशा गावाकडे निघालो. तिथूनच रस्ता महिपतगडावर जातो. 
























महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...